साजूरमध्ये गाडी स्टार्ट केली अन् ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला
कराड ः- ई बाईक चार्जिंग केल्यानंतर ती चालू करून चालक चालवताना गाडीचा स्फोट झाल्याची घटना कराड तालुक्यातील साजूर येथे घडली. चालत्या गाडीतून धूर येवू लागल्याने दुचाकी चालक गणेश चव्हाण तात्काळ गाडी सोडून बाजूला झाला अन् बॅटरीचा स्फोट झाला. यामध्ये ई बाईकची बॅंटरी अन् सीट कव्हर जळून खाक झाले आहे.
गणेश चव्हाण यांची गाडी क्रमांक (एमएच- 50- टी- 4651) घरातून घेवून बाहेर पडताच गाडीच्या बॅंटरीचा स्फोट झाल्याने आजूबाजूचे लोकांनी गर्दी केली. तसेच मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून गाडीला लागलेली आग विझवली. या स्फोटामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. गाडीवर बसल्यानंतर लगेचच स्फोट झाल्याने नशीब बलवत्तर म्हणूनच गणेश चव्हाण या युवकाचा जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
ई बाईकच्या स्फोटमुळे गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. गाडीच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, चालक गणेश चव्हाण याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे घटनास्थळावरून समजले आहे.