सहापदरी रस्ता ठेकेदारांची मनमानी : वराडे येथे दुचाकींची धडक; दोघे जखमी
उंब्रज | आशियाई महामार्गावर सहापदरीकराणाचे काम सुरू असून ठेकेदारांकडून मनमानी पध्दतीने काम सुरू आहे. यांचा फटाका वाहनचालकांना बसत असून याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. या मनमानी पध्दतीमुळे सामान्य नागरिक आणि वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कराड सातारा लेनवर तळबीड पोलीस ठाण्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर ही घटना घडली. सहापदरीकरणाच्या निकृष्ट कामामुळे हा अपघात घडल्याने नागरिकांनी घटनास्थळी संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावर वराडे (ता.कराड) गावच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तळबीड पोलीस ठाण्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी पाठवले आहे. अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान, पुर्वीच्या रस्त्याशेजारी नवीन भराव टाकून रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, योग्य काळजी घेतली गेली नसल्याने अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.