मनोज जरांगेला अटक करा, मुसक्या बांधा : ॲड. गुणरत्न सदावर्ते
हॅलो न्यूज | पोलिसांसमोर येवून माझ्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच आंदोलकांनी माझ्या घरात येण्याचा प्रयत्न केला. मला भीती दाखविण्याचा प्रयत्न सुरू असून मी भिणार नाही. या सर्व घटनेवर राष्ट्रवादीचे वयोवृध्द पुढारी शरद पवारांनी उत्तर द्यावे. मनोज जरांगेला अटक करा, मुसक्या बांधा अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची आज काही तरूणांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून अद्याप दोघे फरार आहेत. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली. तसेच यावेळी ॲड. सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ॲड. सदावर्ते म्हणाले, सरकारने एकट्या जरांगेच ऐकायचं नाही. आमचं सुध्दा ऐकलं पाहिजे. जरांगेचा लाड तुम्ही थांबवला नाही तर मी सुध्दा प्राणांतिक उपोषण सुरू करेन. माझ्या गाड्याची फिल्मस्टाईल तोडफोड केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणं अशक्य आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर म्हणाले, तो मी नव्हेच
मराठा आरक्षणाला विरोध आहे, का असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, तो मी नव्हेच म्हणणारे अनेक असतात, म्हणत मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे सूतोवाच केले. पेलणार, झेपणार नाही असे मनोज जरांगे म्हणत आहेत. मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाने असंवैधानिक म्हटले आहे. मराठा आरक्षण मृगजळ आहे. ते मिळू शकत नाही, असेही श्री. सदावर्ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा मराठा आरक्षणाला आजही विरोध असल्याचे दिसत आहे.