ढेबेवाडी भागातील अष्टविनायक पतसंस्था चोरट्यांनी फोडली
पाटण । काळगाव- भरेवाडी (ता. पाटण) येथील अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आली. अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व्यवस्थापक दत्तात्र्यय दिनकर पवार (वय- 48, रा. भरेवाडी-काळगाव) यांनी याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळगाव- भरेवाडी फाटा येथे अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आहे. बुधवारी (दि.12 जुलै) रोजी दिवसभराचे काम उरकून पतसंस्था कुलूप लावून बंद केली होती. सकाळी पतसंस्था असलेल्या बिल्डिंगचे मालक रामचंद्र पाचुपते यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संस्थेचे कर्मचारी रामचंद्र बावडेकर यांना बोलावून घेतले. यावेळी संस्थेचे शटर कोणीतरी उचलल्याचे दिसून आले. यानंतर माजी चेअरमन गोविंदराव गोटुगडे, व्हाईस चेअरमन दिनकर पाचुते, पोलीस पाटील नितीन पाटील हे घटनास्थळी आले. यावेळी हा चोरीचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब सदर माहिती ढेबेवाडी पोलिसांना दिली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथक, ठसे तज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांनी पहाणी केल्यावर लक्षात आले की, पतसंस्थेच्या कॅशियर काउंटरच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम 64 हजार 335 रुपय चोरून नेले. दरम्यान सदर घटना cctv मध्ये कैद झाली असून दोन चोरटे धामणी कडून काळगावकडे जाणाऱ्या रस्त्याने भरेवाडी येथे आले व त्यांनी पतसंस्थेजवळ दुचाकी उभी करून पतसंस्थेच्या बाहेरील cctv कॅमेरा फोडला व कटरच्या सहाय्याने शटरचे दोन्ही टाळे कापून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी आतील एक cctv कॅमेरा तोडून टाकला व कॅशियर काउंटरच्या ड्रॉवरमधून रोख रक्कम 64 हजार 335 रुपय चोरून नेले. त्यांनी तोंडावर रुमाल बांधल्याने ओळख पटवता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास सहाय्याक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक तपास श्री. राक्षे करत आहेत