प्रहारचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच, चर्चा निष्फळ
कराड ः- उपजिल्हा रूग्णालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीस्तक सुभाष कदम यांनी भेट देऊन त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र मागण्यांबाबत अद्याप तोडगा निघाला नसल्याने शुक्रवारी चौथ्या दिवशीही उपोषण सूरूच होते.
कराडला मंजुर झालेली पॅथलॅब कराडलाच व्हावी, यासह बोगस सुरक्षा रक्षक नेमणूक, बोगस कामगार नोंदणी, तसेच खाजगी रूग्णालयात प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षकांवर कारवाई करावी. उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांकडून पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी मंगळवार पासून उपजिल्हा रूग्णालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनास विविध राजकीय पक्ष, समाजिक संघटना, स्थनिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी व नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी शेतकरी संघटनेचे प्रमोद जगदाळे, साबिरमियाँ मुल्ला, संदिप पाटील, मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल, भिमआर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी, अमित जाधव, प्रकाश पिसाळ, दादा चव्हाण, प्रल्हाद भोसले, संदिप थोरात, संदिप सावंत, विकास पाटोळे, अक्षय कोरे व नागरीकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा दर्शविला.