कोरेगावच्या मैदानात बकासुर- बलमा बैलजोडीने लाखाचे बक्षीस पटकाविले
कोरेगाव | श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त झालेल्या हिंदकेसरी बैलगाड्यांच्या शर्यतीत बकासुर व सातारा एक्स्प्रेस बलमा या बैलगाडीने कोरेगावच्या मैदानात पहिला क्रमांक मिळवला. संभाजीराव सर्जेराव बर्गे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव किरण संभाजीराव बर्गे यांनी पुरस्कृत केलेले प्रथम क्रमांकाचे 1 लाख 1 हजार रुपयांचे बक्षीस व शील्ड प्रदान करण्यात आले. हिंदकेसरी मैदानात राज्यातील 222 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता.
शर्यतीत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 81 हजार रुपये 1 व शील्ड कात्रज येथील निसर्ग गार्डन सुभाषतात्या मांगडे यांच्या बैलगाडीने पटकावले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस 61 हजार 1 रुपये व शील्ड ओगलेवाडी येथील संग्राम उदयसिंह पाटील यांच्या ज्योतिर्लिंग प्रसन्न बैलगाडीने पटकावले. शर्यतीमधील अंतिम फेरीतील विकास अशोक शिंदे (वाटेगाव बुदेवाडी, जि. सांगली), नियती भिवराव बुधकर (रामुशीवाडी, ता. कोरेगाव), सेवागरी प्रसन्न- राजेंद्र गिरी (सातारा) व राहुल विठ्ठल कापले (कोडोली सातारा) यांच्या चार बैलगाड्यांना 35 हजार रुपये बक्षीस व प्रत्येकी शील्ड देण्यात आले.
अंतिम फेरीतील एक ते सात विजेत्या बैलगाडी चालकांना 5500 ते 2500 व शील्ड सूरज पतंगराव निंबाळकर यांच्यातर्फे देण्यात आले. आखाड्याचे नियोजन यात्रा समिती अध्यक्ष शहाजीराव बर्गे, उपाध्यक्ष सी. आर. बर्गे, सचिव गजाभाऊ बर्गे, भानुदास सुतार, यात्रा समिती सदस्य, नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.