भैरवनाथ यात्रा : पाठरवाडी- गमेवाडी 5 कोटी 50 लाखांच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात, गुरूवारी यात्रा
रात्रीचा प्रवास भाविकांनी टाळावा, यात्रा कमिटीचे आवाहन
कराड :- तांबवे- पाठरवाडी येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा बुधवार- गुरूवार या दोन दिवसात पार पडणार असून गुरूवारी (दि. 11) पहाटे 6 वाजता गुलाल- खोबऱ्यांची उधळणीत पालखी सोहळा संपन्न होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून 5 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गमेवाडी- पाठरवाडी हा डोंगरातील नव्याने तयार होणारा रस्त्यावरून रात्रीचा भाविकांनी वाहनाने प्रवास करू नये, असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.
पाठरवाडी येथील डोंगरावर तांबवे, गमेवाडी, साजूर, डेळेवाडी, आरेवाडी, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे या गावांसह परिसरातील गावाचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ हे आहे. या यात्रेसाठी तांबवे, काले, शेरे, गमेवाडी, दुशेरे, वाटेगाव (जि. सांगली) तसेच पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी, सासनकाठ्या येत असतात. गेल्या अनेक वर्षापासून पाठरवाडी गावाला तसेच श्री. भैरवनाथ देवाला जाण्यासाठी रस्त्यांची मागणी होत होती. परिसरातील ग्रामस्थांच्या तसेच प्रशासनाच्या सहकार्यांने लोकसहभागातून रस्त्यांच्या कामाला शुभारंभ झाला होता. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 25- 25 लाख रूपयांचा निधी दोनदा या रस्त्यासाठी दिला. तर सध्या रस्त्याचे काम सुरू असून त्याकरिता 5 कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे एस. पी कंपनीचे ठेकेदार सचिन पवार यांनी सांगितले आहे.
रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
गमेवाडी- पाठरवाडी या डोंगरातील रस्त्यांवर अनेक मोठ- मोठे चढ- उतार आणि वेडीवाकडी वळणे होती. त्यामुळे वाहन चालकांनी कसरत करावी लागत होती. परंतु, साडेपाच कोटीच्या निधीतून रस्त्यावरील अवघड वळणावर मोठे रस्ते करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी रस्ता चांगला करण्यात आला आहे. मात्र, तरीही नव्याने या रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालक- प्रवासी यांना अंदाज येवू शकत नसल्याने खबरदारी म्हणून रात्रीचा या रस्त्याने प्रवास करू नये, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
भाविकांसाठी बुधवारी सायंकाळी महाप्रसाद
तांबवे येथील कै. विमल वामनराव पाटील यांच्या स्मरणार्थ सलग २३ व्या वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पाठरवाडी येथील श्री. भैरवनाथ मंदिर परिसरात बुधवारी (दि.10) सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत अन्नछत्र महाप्रसाद सुरू असणार असल्याची माहिती कराड आगाराचे एसटी ड्रायव्हर वसंतराव पाटील यांनी सांगितले आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी श्री. फर्निचर आणि गुरूकृपा मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.