सांगली। पश्चिम महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने जोरदार मुसंडी मारण्यास सुरूवात केली आहे. पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रवेशानंतर आता सांगली जिल्ह्यातील एका शेतकरी नेत्याने आज प्रवेश केला. मुख्यमंत्री कें. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आलीबाबा असून बाकीचे चाळीस चोर आहेत, अशी टीकाही रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भगीरथ भालके, बी. जी. पाटील, हणमंत पाटील, गणेश शेवाळे आदीसह शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. वाटेगाव येथील जाहीर कार्यक्रमानंतर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या साखराळे येथील निवासस्थानी स्नेह भोजनासाठी थांबले होते. यावेळी रघुनाथ पाटील यांनी आपण बीआरएस पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच येत्या 9 ऑगस्ट रोजी इस्लामपुरात पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
रघुनाथ पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय देणारा व त्यांचे प्रश्न सोडविणार एकही राजकीय पक्ष नाही. बीआरएस पक्षाने तेलंगणातील शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत दिले आहे. त्यामुळे बीआरएस हा एकच पक्ष शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी आमची धारणा झाली आहे. त्यामुळे आम्ही या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आम्ही पाठिंबा देवून पाहिला. मात्र, एकाही पक्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. राज्यातील सर्व नेते लुटारु आहेत.