कराड उत्तरेत विधानसभा दुरंगी, तिरंगी कि चाैरंगी? वातावरण तापू लागले
(विशाल वामनराव पाटील)- हॅलो न्यूज :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण शड्डू ठोकू लागले आहेत. कराड उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विरूध्द भाजप अशी लढत पहायला मिळेल, अशी अपेक्षा असताना आता तिसरा चेहरा रिंगणात उतरणार जाहीर केले आहे. कराड उत्तरेत एकूण दुरंगी, तिरंगी कि चाैरंगी निवडणूक होणार याबाबत आतापासूनच वातावरण तापू लागले आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ असा एकमेव मतदार संघ जो चार तालुक्यातील गावात विभागला गेला आहे. यामध्ये कराड, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्याचा समावेश आहे. या मतदार संघावर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचेच वर्चस्व पहायला मिळत आले आहे. मात्र, लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित धक्का दिला. राष्ट्रवादीला मिळणारे 50 हजारांच्या घरातील मताधिक्य अवघे 1700 मतांवर आल्याने भाजपाचा विश्वास दुणावला आहे. तर राष्ट्रवादीच्या आ. पाटील गटावर विचारमंथनाची वेळ आली आहे.
छ. उदयनराजे भोसले यांचा लोकसभेचा विजय हा कराड उत्तर मतदार संघावर अवलंबून होता. तिथे भाजपाने एकजूट दाखवत महाविकास आघाडीला फाजील अतिआत्मविश्वासात ठेवत विजय सोपा केला. त्यानंतर आता छ. उदयनराजे भोसले यांचे विश्वासू साथीदार असलेले युवानेतृत्व कुलदीप क्षीरसागर यांनी मसूर येथे मेळावा घेत आगामी निवडणूक लढणार असल्याचे घोषणा केली आहे. कुलदीप क्षीरसागर यांच्याकडे चिखली ग्रामपंचायत असून सामाजिक कार्यातही मोठी अोळख आहे. सध्या महाविकास आघाडीकडून एकच आ. बाळासाहेब पाटील यांचे नाव पुढे असताना महायुतीत इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे.
उत्तरमधील चर्चेतील विधानसभेची नांवे
कराड उत्तर मतदार संघातून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीतून तर महायुतीतून पहिल्या पसंतीचे नाव म्हणून मनोज घोरपडे यांचे नाव आघाडीवर आहे. तर इच्छुकात भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ हेही आहेत. त्यामुळे चर्चेतील या इच्छुक नावांमुळे कराड उत्तरेत नेमकी दुरंगी, तिरंगी की चाैरंगी लढत होणार याबाबत उत्सुकता असून राजकारण आतापासूनच तापलेले आहे.