महाराष्ट्रात भाजपाला पराभव दिसत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड तालुक्यातील कोळे, विंग येथे जनसंवाद पदयात्रा
कराड | काॅंग्रेस पक्षाची भूमिका आणि गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने जनतेची केलेली फसवणूक लोकांना सांगण्यासाठी जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. मोदी तिसऱ्यांदा 2024 साली निवडणूक जिंकल्यास देशातील लोकशाही नष्ट होईल. त्यानंतर विधानसभेसह अन्य निवडणूका होणार नाहीत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानानुसार देश चालणार नाही, ते कुठेतरी ठेवले जाईल. तेव्हा लोकशाही वाचविण्यासाठी आणि हुकुमशाही हटविण्यासाठी देशातील 28 पक्ष इंडिया आघाडीत एकत्रित आले. मात्र, महाराष्ट्रात भाजपाला पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडली. परंतु, पाठित खंजीर खुपसणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच स्विकारणार नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कोळे येथे काॅंग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेनिमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दक्षिण कराड मतदार संघात आयोजित जनसंवाद यात्रा चचेगाव, विंग, येरावळे, शिंदेवाडी, घारेवाडी, येणके, किरपे, पोतले या गावातुन काढण्यात आली.यावेळी प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अजित पाटील- चिखलीकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, गिताजंली थोरात, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, प्रा. धनाजी काटकर, झाकीर पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सरपंच भाग्यश्री देसाई, उपसरपंच सुधीर कांबळे, संतोष शिनगारे, सदस्या करिश्मा संदे, लतिफा फकीर, अर्जुन कराळे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
अजित पाटील- चिखलीकर म्हणाले, काकांनी काॅंग्रेसचा विचार जपला. त्याच्यामागे आता उदयसिंह दादा यांनीही तोच विचार पुढे नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. काकांना 2014 साली अनेक अमिषे आली, परंतु काकांनी साफ नकार दिला अन् काॅंग्रेसचा विचार जपला. काहींनी स्वतः च्या स्वार्थासाठी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना काहींनी काॅंग्रेसला जवळ केले. त्यानंतर आता भाजपात गेले, त्यांना कोणताही विचार- आचार नाही. त्यांनी ऊसाचे राजकारण केले, तेव्हा काकांनी सामान्य शेतकऱ्यासाठी रयत कारखाना उभा केला. सुत्रसंचलन अशोक पाटील- पोतलेकर यांनी केले. आभार सरपंच भाग्यश्री देसाई यांनी मानले.