कराड उत्तरची भाजपा होतेय चार्ज : ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रमामुळे गावागावात संपर्क

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सांगता वर्षाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान सुरू केले आहे. गावा- गावात भाजप कार्यकर्त्यांना हे अभियान पोहोचवण्यास सांगण्यात आहे. कराड उत्तरेत रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू असल्याने कराड उत्तरेतील भाजप चार्ज झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे अभियान घराघरात पोहोचवले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने गावोगाव जाऊन देशाप्रती पंचप्राण शपथ घेतली जात आहे. त्याचबरोबर गावची माती गावकऱ्यांनी अमृत कलशामध्ये भरून भाजप नेत्याकडे सुपूर्द केली.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जन समर्थन मिळत असल्याने उत्तरेतील भाजपा चार्ज होताना दिसत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कराड उत्तर निवडणूक प्रमुख रामकृष्ण वेताळ यांनी भाजपच्या वतीने कराड उत्तरमध्ये झंझावाती दौरा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने आखून दिलेला प्रत्येक कार्यक्रम कराड उत्तरेमध्ये योग्य रीतीने राबवला जात आहे. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या लोककल्याणाच्या योजना यांची माहिती लोकापर्यंत पोहोचवली जात आहे. त्याचबरोबर मातृभूमीच्या मातीला नमन, शूरवीरांना वंदन, गावातील शिलास्तंभाचे पूजन कार्यक्रम होत आहेत. आजी- माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला जात आहे. परिश्रमातून कराड उत्तरमध्ये भाजपाची वोट बँक सुधारत असल्याचा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. या अभियानासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, सुरेश पाटील, जिल्हा सचिव दिपाली खोत, शंकरराव शेजवळ, शहाजी मोहिते, दत्तात्रय साळुंखे, जयवंत जगदाळे, नवीन जगदाळे यासह भाजप कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
एकजुटीने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते ः रामकृष्ण वेताळ
कराड उत्तरेतील भाजप नेत्यांनी एकजूट कायम ठेवली व प्रयत्न केल्यास भाजपाला नक्की यश मिळणार आहे. बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात सर्व भाजप एकजुटीने लढली अन् यश मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा, लोकसभेत एकजुटीने लढल्यास यश नक्की आहे असा विश्वास कराड उत्तरचे निवडणूक प्रमुख रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.