कराड, मलकापूरचा लाचखोर अभियंता निलंबित : आयुक्ताचा आदेश

कराड । मागील आठवड्यात कराडच्या रस्त्याच्या कामाचे बिल अदा करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेणारा मलकापूर येथील स्थापत्य अभियंता शशिकांत पवार याला निलंबित करण्यात आले. पालिका संचालनालयाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
मलकापूरचा अभियंता पवार याच्याकडे कराड पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. त्यावेळी एका रस्त्याच्या कामाचे 22 लाख रुपयांचे काम झाले होते. त्या बदल्यात संबंधित सब ठेकेदाराला पवार याने बेचाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित ठेकेदाराने त्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पवार याच्यावर सापळा रचून 10 जुलै रोजी कारवाई झाली होती. त्याला तीस हजार रुपयांची लाच घेताना खाजगी व्यक्तीसह अटक झाली. त्याचा तपास सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अभियंता श्री. पवार याला निलंबित करावे असा अहवाल दिला होता. त्यानुसार पालिका प्रशासन संचालनालय आयुक्त डॉक्टर कुलकर्णी यांनी पवारला निलंबित केल्याचा आदेश आज दिला. निलंबन कालावधीत पवार याला कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.