हणबरवाडी- शहापूर उपसा सिंचन योजनेसाठी उद्या मसूरला रास्ता रोको : मानसिंगराव जगदाळे
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
हणबरवाडी शहापूर उपसा सिंचन योजनेसाठी २८ डिसेंबर २०२२ ला मोटर पंप चालु करुन पाईपलाईन चाचणी झाल्यापासून आज अखेर योजना चालू नाही. योजना चालू करणेसाठी कराड उत्तर मधील 19 गावांच्या ग्रामस्थांचा शुक्रवारी ता 18 ला मसूरच्या जुन्या बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, प्रा कादर पिरजादे, महेश घाटगे उपस्थित होते. कराड उत्तर मतदार संघातील मसूर विभागातील दुष्काळग्रस्त पुर्व भागास कायमस्वरुपी पाणी मिळणेसाठी आदरणीय पी. डी. पाटील यांनी हणबरवाडी- शहापूर व धनगरवाडी- बानुगडेवाडी उपसा सिंचन योजना आरफळ कालव्यावर होण्यासाठी शासन दरबारी परीश्रम घेतले. सन१९९९ ला कि.मी. ६० निगडी माळावर (मसूरहून) आरफळ कालव्यातुन पाणी पुढे ८५ कि.मी पर्यंत आणने व तासगाव सांगलीला देणे करीता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी जलसंपदा विभागास आराखडा करुन चालु करणेकामी आदेश दिले होते. या दोन्ही योजना चालु करणेसाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी लक्ष देवून निधीची पुर्तता करुन काम सुरु केले.
नोव्हेंबर २०२२ ला हणबरवाडी शहापुर योजनेकरीता महावितरणचा विद्युत पुरवठा चालु झाला. २८ डिसेंबर २०२२ ला मोटर पंप चालु करुन पाईपलाईन चाचणी झाली. किरकोळ पाईपलाईन लिकेज काम पुर्ण केल्यानंतर पुन्हा रितसर योजना फेब्रुवारी २०२३ पासून चालु होणे गरजेचे होते.मात्र आज अखेर झाली नाही. विभागातल्या गावांना सुमारे २६०० हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. हणबरवाडी, शहापूर योजना ताबडतोब चालु करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली.
वीज न वापरता १० लाखांचे बिल
हणबरवाडी शहापूर योजनेची चाचणी केली असता सुमारे २० हजार युनिटचा वापर झाला असून महावितरणाचा डिमांड चार्ज प्रति माहे सुमारे दिड लाख प्रमाणे आहे. आज अखेर वीज वापर न होता वीज बिल थकीत सुमारे १० लाखांच्या पुढे गेलेले आहे.