कृष्णा नदीत गणपती विसर्जन करण्यास गेलेला मुलगा बुडाला : दोन दिवसांपूर्वी वाढदिवस अन् घटना

मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
खराडे (ता कराड) येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करण्यास गेलेला युवक बुडाला. गणेश संतोष जाधव (वय- 19) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप मुलाचा शोध सुरू असून तो बेपत्ता आहे. गणेशचा दोन दिवसांपूर्वी बुधवारी दि. 27 रोजी वाढदिवस झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गणेश जाधव गेला असताना नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला पोहता येत नव्हते. कराड नगरपालिकेचे शोध पथक नदीत त्याचा शोध घेत आहे. पोलीस प्रशासन सतर्कतेने लक्ष ठेवून आहे. त्याची शोध मोहीम सुरू असल्याचे मसूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
गणेश यांच्या घरी आई – वडिल व एक लहान बहिण असा परिवार आहे. गणेश हा कराडच्या एसजीएम महाविद्यालयात शिक्षण घेत असून पुणे सैन्य भरतीची तयारी करत होता. गणपती सणासाठी तो गावी आला होता. घटनास्थळी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली आहे.



