स्वारगेट- महाबळेश्वर ST बस घाटात ब्रेक फेल : प्राध्यापक पती- पत्नी बसखाली, पत्नी ठार

पाचगणी। वाई – महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात ब्रेक फेल झालेली बस पाठीमागे येवून एका दुचाकीसह कठड्याला धडकली. यामध्ये सुदैवाने सुरक्षा कठड्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी पाठीमागून आलेले दुचाकीवरील प्राध्यापक पती- पत्नी बसखाली आल्याने मोठा अनर्थ घडला. या अपघातात पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाई- महाबळेश्वर मार्गावरील पसरणी घाटात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट- महाबळेश्वर बसचे बुवासाहेब मंदिरानजिक क्रमांक (एमएच- 06- एस-8054) ब्रेक झाल्याने बस उताराला पाठीमाने घसरली. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून प्रीती योगेश बोधे (वय- 40, रा. पाचगणी) व योगेश दामोदर बोधे हे दोघे दुचाकी क्रमांक (एमएच-12 एयू -6067) वरून वाईहून पाचगणीला जात होते. यावेळी स्वारगेटहुन महाबळेश्वरला निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती उताराने वेगात मागे आली. बसचा ब्रेक निकामी झाला ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस नाल्याच्या दिशेने घसरली.
अचानकपणे बस मागे येत असल्याचे लक्षात येण्याआधीच पाठीमागून येणारी दुचाकी बसखाली सापडली. या अपघातात प्रीती बोधे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने घाटातील सुरक्षा कठड्यामुळे बस दरीमध्ये जाता जाता बचावली आहे. प्रीती बोधे या वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय विभागात प्राध्यापक होत्या. पती योगेश पाचगणी येथील सेंट पीटर निवासी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. वाई येथील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन ते दोघे पाचगणीला जात होते.