कराडजवळ महामार्गावर BSF जवानाचा अपघातात मृत्यू
कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर कराड शहराजवळ चारचाकी गाडीच्या धडकेत BSF जवानाचा मृत्यू झाला आहे. नांदलापूर फाटा (ता. कराड) येथे शेवाळेवाडी कारने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदलापूर गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नितीन मोहन शेवाळे (वय- 32) आणि प्रथमेश शेवाळे (रा. शेवाळेवाडी, ता. कराड) हे गंभीर जखमी झाले. दोघांना हायवे हेल्पलाईन, पोलीस आणि स्थानिकांनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर नितीन शेवाळे यांचा मृत्यू झाला.
शेवाळेवाडी- उंडाळे येथील नितीन शेवाळे हा गंगानगर- राजस्थान येथे BSF मधील जवान आहे. नितीन विवाहीत असून गेल्या 4 दिवसांपूर्वी शेवाळेवाडी येथे गावी सुट्टीला आलेला आहे. एक महिना सुट्टीवर आलेल्या जवान नितीनच्या मृत्यूने उंडाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अपघात विभागाचे खलील इनामदार, श्री. चतुर यांनी धाव घेत जखमींना मदत केली.