म्हैस चोरट्याला शेतकऱ्याने पकडले : कराड तालुक्यातील घटना
कराड | वस्तीवरील शेडमध्ये बांधलेली म्हैस चोरुन नेत असतानाच शेतकरी त्याठिकाणी आला. त्यामुळे म्हैस जागेवरच सोडून पळून जात असताना बांधावरुन पडल्याने एका चोरट्याचे डोके फुटले. तर दोघे तेथून पसार झाले. या चोरट्याला शेतकऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. टेंभू (ता. कराड) येथे ही घटना घडली. विशाल बाबासाहेब मदने (रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) असे याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. शेतकरी जगन्नाथ बबन भंडलकर यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथील जगन्नाथ भंडलकर यांची शेतावर वस्ती आहे. त्याठिकाणी त्यांनी शेड बांधले असून शेडात एक म्हैस बांधली होती. 21 आॅक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर म्हैशीला वैरण टाकण्यासाठी भंडलकर वस्तीवर गेले. त्यावेळी तीघेजण शेडमधील म्हैस सोडून चोरुन घेवून जाताना दिसले. त्यामुळे भंडलकर यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरटे म्हैस तेथून सोडून पळून जावू लागले. मात्र, त्याचवेळी विशाल मदने याचा बांधावरुन पाय घसरल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला दुखापत होवून रक्त येवू लागले.
तोपर्यंत जगन्नाथ भंडलकर यांनी गावात फोन करुन ग्रामस्थांना बोलावून घेतले. तसेच चोरटा विशाल मदने याला पकडून ठेवले. ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यानंतर कराड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मदने याला ताब्यात घेवून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संदीप कांबळे तपास करीत आहेत.