कराड- ढेबेवाडी मार्गावर बसेस रोखल्या : विद्यार्थी आक्रमक
कराड। अपुऱ्या बसगाड्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या पासधारक विद्यार्थ्यानी कराड- ढेबेवाडी मार्गावरील बस विंग- येरवळे थांब्यावर रोखल्या. सुमारे तासभर विद्यार्थी- विद्यार्थींनी बसरोको आंदोलन केले. ग्रामीण भागात वेळेत आणि स्वतंत्र बसची मागणी निवेदनाद्वारे केली. अखेर आगार व्यवस्थापन आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतले.
विंग, येरवळे परिसरातून विद्यालय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कराडला तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये- जा शिक्षणासाठी विद्यार्थी करतात. कराड- ढेबेवाडी मार्गावर येथील विंग हॅाटेल येथील बसथांब्यावर शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. सकाळी साडेआठपासून विद्यार्थी येथील थांब्यावर बससाठी थांबतात. ढेबेवाडी मार्गावरून येणाऱ्या बसने कराडला जातात. नेहमीप्रमाणे नऊनंतर विद्यार्थी त्याठिकाणी गोळा झाले होते. पन्नासहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी बसची वाट पहात होते. मात्र, ढेबेवाडी मार्गावरून आलेल्या बस त्याठिकाणी नेहमीप्रमाणे थांबल्या नाहीत. विद्यार्थ्याची गेल्या अनेक दिवसापासून मोठी गैरसोय होत आहे. बसेसमध्ये प्रवेश न देणे, थांबा सोडून अन्यत्र रस्त्यावर बस थांबवणे आदी समस्येने वैतागलेल्या विद्यार्थ्यानी कराड- ढेबेवाडी मार्गावरील बस रोखल्या. सुमारे तासभर बसरोको अंदोलन केले.
यापूर्वी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतंत्र अणि वेळेत बसची मागणी कराड आगाराकडे निवेदनाद्वारे केली. तरीही संबधित विभागाने गांभीयार्याने दखल घेतली नाही, असे गाऱ्हाणे विद्यार्थ्यानी यावेळी मांडले. सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलजा पाटील, पोलीस हवालदार गणेश वेदपाठक, पोलीस नायक समीर कदम, संजय काटे, मोहित गुरव, जयसिंग राजगे, योगेश गायकवाड, पोलीस पाटील रमेश खबाले यांनी यावेळी मध्यस्थी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबधीत आगार व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलजा पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.