(Video) वडगाव हवेलीत मराठा आरक्षणासाठी कॅण्डल मार्च : उद्या कराडला अबालवृध्दांसह उपस्थित रहा
वडगाव हवेली | मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी वडगाव हवेली (ता. कराड) येथे आज सायंकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आले. यावेळी चिमुकल्यांसह अबालवृद्धांनी हातात कॅण्डल घेवून गावातून फेरी काढली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी गाव व परिसर दुमदुमून गेला. फेरीनंतर मुख्य वेशीत आरक्षणाबाबत प्रबोधनपर भाषणे झाली. यावेळी सोमवारी कराडला होणाऱ्या मोर्चाला अबालवृध्दांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
सायंकाळी सात मुख्य वेशीत चिमुकली मुलं, तरुण व अबालवृद्ध एकत्रित आले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मशाल पेटवण्यात आली. व गावातून कॅण्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. फेरीच्या पुढे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे – पाटील यांना एकमुखी पाठिंबा असलेला फलक घेवून चिमुकले होते. त्यामागे गावातील सर्व पक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होते. ही फेरी आरक्षणाच्या घोषणा देत गावातून फिरवण्यात आली.
फेरी वेशीमध्ये माघारी आल्यानंतर युवक व ग्रामस्थांची भाषणे झाली. तसेच गावात कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच राजकीय मतभेद विसरून समाजासाठी होणाऱ्या चळवळीत एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी गावातील मुस्लिम समाजातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या पाठिंब्याचे पत्र चिमुकल्यांनी स्वीकारले.