सातारा पोलिस दलात खळबळ : एक लाखांची लाच घेताना 2 पोलिस अधिकारी रंगेहाथ सापडले

सातारा | सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आलेली आहे. औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब जाधव यांना 1 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत एका 42 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. सदरची कारवाई आज जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण, औंध (ता.खटाव) येथे करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तसेच तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी दत्तात्रय दराडे आणि बापुसाहेब जाधव यांनी दीड लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तंडजोडीनंतर 1 लाख रूपये लाच रक्कम स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. औंध पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य, पो.ना.2028 निलेश चव्हाण, पो.शि. 669 तुषार भोसले, पो. शि.248 निलेश येवले यांनी कारवाई केली.