प्राणी पकडा अन्यथा शिकाऱ्यांना बक्षीस देऊन शिकार अभियान राबवणार : संतप्त शेतकऱ्यांचा इशारा

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
किवळ भागात उपद्रवी व त्रासदायक ठरणाऱ्या प्राण्यांच्या विरोधात बक्षिसांच्या लयलूटीत शिकार करा, अभियान राबवणार असल्याचा इशारा किवळ (ता. कराड) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांमुळे भरमसाठ नुकसान झाले आहे. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने 15 सप्टेंबर पर्यंत तुमचे प्राणी तुम्ही पकडून सुरक्षित ठिकाणी घेऊन जा अन्यथा शेतकऱ्याला त्रासदायक ठरणाऱ्या प्राण्यांविरोधात जिल्ह्यातील शिकाऱ्यांना आमंत्रित करून शिकार करा अभियान राबवावे लागत असल्याचे श्री. साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्यावतीने बोलताना प्रदीप साळुंखे म्हणाले, कायद्याने शेतकऱ्याला आपल्या पिकांची संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मागील अनेक दिवसांपासून वानरे, रानडुकरे यांच्या त्रासापासून पाडळी, किवळ, खोडजाईवाडी,गायकवाडवाडी, निगडी, घोलपवाडी, चिखली परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. ऊस, भुईमूग यासारखी उभी पिके, अन्य पिकांसह फळबागा यांचे वानरे व रानडुकरांकडून प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरे जात असताना वन्य प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. झालेल्या नुकसानीची पाहणी नाही. पंचनामे करणे तर दूरच. रात्र रात्रभर जागून शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाचे संरक्षण करावे लागत आहे. वनविभाग शासनाने पाळलेला पांढरा हत्ती आहे. वन विभागाचे वनासाठी कोणतेही योगदान नाही. वनविभागाने प्राण्यांसाठी आवश्यक असणारी झाडे लावल्यास वन्यप्राणी शेतकऱ्यांना त्रास देणार नाहीत. निसर्गाने दिलेल्या झाडांच्या संरक्षणाव्यतिरिक्त वन्य विभागाचे अतिरिक्त असे कोणतेही योगदान नाही.
दि. 13 मार्चला वनाधिकारी यांना कराड कार्यालयात जाऊन याबाबत सर्व माहिती दिली होती. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दोन वेळा किवळ मधील नागरिकांनी स्वखर्चाने वानरे पकडून विविध ठिकाणी जंगलात सोडून दिली होती. दि. 15 सप्टेंबर नंतर कोणत्याही वनाधिकारी अथवा कर्मचाऱ्यास या भागात फिरकू देणार नाही. असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शिकाऱ्यांना आमंत्रित करून शिकार करा अभियान आम्ही शेतकरी राबवणार आहोत.रानडुक्कर, वानर या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांना आमंत्रित करणार असून वानर मारणाऱ्या शिकाऱ्यास एक हजार रुपये तर रानडुक्कर मारणाऱ्या शिकाऱ्यास दोन हजार रुपये असे उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहे. विभागाचे कर्मचारी, अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले नाहीत तर त्यांना प्राण्यांचा पंचनामा करून देणार नाही असा सज्जड इशारा शेतकऱ्यांच्यावतीने साळुंखे यांनी दिला.