मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दाैऱ्यावर : कोयनेच्या स्कुबा डायव्हिंगसह बाबू लागवडीचा घेणार आढावा
सातारा प्रतिनिधी। वैभव बोडके
राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या स्कुबा डायव्हिंगसारख्या जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
शेतकऱ्यांना सधन बनविणारी ही योजना असून बांबू लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी पडीक जमिनीतून उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांसाठी तयार होईल. या भागाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे, हा उद्देश ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.
कोयनेच्या बँक वॉटरमध्ये सुरू होणार वॉटर स्पोर्टस
सातारा जिल्ह्यात पर्यटनवाढीला खूप मोठी संधी असून पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करुन विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. कोयनेच्या ७० कि.मी. च्या बॅक वॉटरमध्ये ऑफिशिअल सिक्रेट अॅॅक्टमुळे कोणतीही अॅक्टिव्हीटी करण्यास बंदी होती. कोणतेही नैसर्गिक संतुलन न बिघडता त्यात काही शिथिलता आणता येईल का हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार ७ किमी बॅक वॉटर आणि दोन किमी बफर झोन वगळता उर्वरित भागात वॉटर स्पोर्ट सुरू करण्यास मंजुरी मिळालेली आहे. लवकरच त्याबाबत एमटीडीसी आणि जलसंपदा विभागादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. बांबू लागवड मिशन आणि कोयना धरणातील वॉटर स्पोर्ट्स या दोन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.