मुख्यमंत्र्याच्या गावाकडे जाणारी बंद तराफा (जल वाहतूक) सेवा सुरू

सातारा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा कोयना जलाशयात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोयना जलाशयात मागील तीन महिन्यापासून पाणीसाठा नसल्यामुळे ही तराफासेवा बंद करण्यात आली होती. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा- तेटली गावची सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्याने दळणवळण सेवा सुरू करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलायशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावकडे जाणारी तराफा वाहतूक सेवा पाणी कमी झाल्यानंतर बंद होते. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरण क्षेत्रात पाऊस चांगल्या प्रमाणात कोसळत आहे. सध्या धरणात 75 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा साठलेला आहे. त्यामुळे बंद झालेली तराफा सेवा पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याने सदरची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात येते. मात्र यावर्षी पाणीसाठ्यात वाढ विचारात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 दिवस आधीच तराफा सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे तापोळा- तेटली आणि दरे या गावाचे या तरफ्याच्या माध्यमातून दळणवळण सुरू झाल आहे. यामुळे भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.



