काँग्रेसच ठरलं आज भाजप ठरवणार…? : सह्याद्री कारखाना निवडणूक गाजणार
सह्याद्रीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार :- निवासराव थोरात

कराड :- सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात सह्याद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची बैठक वारुंजी येथे झाली. या बैठकीत सह्याद्रीची निवडणूक सर्व ताकदीनिशी सर्वांना सोबत घेवून लढण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच्या गटाने निवडणूक लढण्याच ठरवलं तर आज भाजपचे आमदार मनोज घोरपडे आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढणार की नाही हे ठरवणार आहे.
या बैठकीची सुरुवात सह्याद्रीच्या उभारणीत सहभागी असलेले किवळ गावचे स्वातंत्र्यसेनानी स्व. भिकोबा आप्पा साळुंखे उर्फ भिकू नाना किवळकर यांना त्यांचे पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक युवानेते अमित जाधव यांनी केले. अविनाश नलावडे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना, सह्याद्रीच्या निवडणूकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील दादा, या नेत्यांच्या एकत्रित मार्गदर्शनाखाली निवडणूक व्हावी असा सूर लावला. कोयना दूध संघाचे चेअरमन प्रा. लक्ष्मण देसाई यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, सुपने-तांबवे विभागात गेल्या १०-१५ वर्षांपासून ऊसतोडीसाठी दरवर्षी टोळ्यांची कमतरता आहे. ऊस उशिरा तुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जातेय त्यामुळे सह्याद्रीत आता परिवर्तन अटळ आहे.
निवासराव थोरात म्हणाले, ३० वर्षे विद्यमान चेअरमन यांच्याच हातात एकहाती कारभार आहे. तरीदेखील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहतो. ज्या सभासदांनी चेअरमन साहेबांना एकहाती बिनविरोध सत्ता दिली. तेच चेअरमन न्यायासाठी दाद मागणाऱ्या सबासदांना विरोधक ठरवत आहेत. स्वतःच्या सुपुत्राचे दोन गटांत नाव नोंदणी केली होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कानउघडणी केल्यांनतर सुपुत्राचे नाव दोन ऐवजी एका गटात कायम ठेवले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेवून प्रायव्हेट लिमिटेड कडे वाटचाल सुरु असल्यानेच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे धोरण आणले होते. मात्र इथे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे. सहकार धोरणासाठी व यशवंत विचार टिकवण्यासाठी अशी एकाधिकारशाही घातक आहे. सह्याद्री कारखान्यातील राजकारणाचा अड्डा उधळून लावून सर्व सभासदांना समान व सन्मानाची वागणूक मिळावी यासाठीच आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. जे जे समविचारी सभासद शेतकरी बांधव सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.
बाबुराव पवार शेठ म्हणाले, आम्ही २००९ पासून संघर्ष करत आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. सभासदांनी एकजूट दाखवून सह्याद्रीत परिवर्तन करुन हा विजय स्व. विठ्ठलराव तात्या आणि हिंदूराव साहेब यांना समर्पित करावा. प्रकाश पाटील कोपर्डेकर यांनी जे सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेवून सह्याद्रीत परिवर्तन करून सर्व सभासदांना समान न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी संग्राम पवार, शिवाजी चव्हाण, रविंद्र शिंदे, सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अनिकेत पवार यांनी सुत्रसंचालन केले तर दत्ता पाटील यांनी आभार मानले.
सह्याद्रीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून २७ फेब्रुवारी २०२५ ते ५ मार्च २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या निवडणुकीसाठी ५ एप्रिल २०२५ रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल ६ एप्रिल २०२५ रोजी जाहीर होणार आहे.