कराडला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घ्या अन् बस सेवा सुरू करा : रामकृष्ण वेताळ
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड तालुक्यातील गावागावांमधून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी विद्यानगर कराडला येत असतात. या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अनेक अडचणींसह हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जादाची पदरमोड करून खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांचा विचार करून कराड तालुक्यातील उंब्रज, चाफळ, तारळे, पुसेसावळी या गावांसाठी शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केली. या मागण्यांचे निवेदन त्यांनी कराड आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, वाहतूक नियंत्रक श्री. कचरे यांना दिले. भाजपा जिल्हा सचिव दिपाली खोत, सरचिटणीस शंकर शेजवळ, नवीन जगदाळे, विस्तारक सुनील शिंदे, सरचिटणीस शहाजी मोहीते, उदय जगदाळे, मानसिंग कदम, सुभाष जाधव, शिवाजी भोसले, अक्षय चव्हाण, रणजीत यादव, राजेंद्र लोहार, सुमित शहा, उत्तम जाधव, शशिकांत जाधव, मानसिंग जाधव, मारुती जाधव,गणेश जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.
कराड शहराची ओळख विद्येचे माहेरघर म्हणून आहे. देश-विदेशाबरोबरच कराड तालुक्यातील सर्व गावातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा प्रवासासाठी अलीकडे जादा खर्च होऊ लागला आहे. कारण शाळेची वेळ आणि बसची वेळ यांचा ताळमेळ बसत नाही. ही समस्या लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी रामकृष्ण वेताळ यांच्याकडे समस्या मांडल्या. त्याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपा कराड उत्तरच्यावतीने आगारप्रमुखाना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी ही शटल सेवा सुरू करण्याबाबतची होती. कराड मसूर मार्गे उंब्रज, कराड मसूर उंब्रज मार्गे चाफळ, कराड मसूर उंब्रज मार्गे तारळे, कराड पाचुंद शाळगाव मार्गे पुसेसावळी, उंब्रज मसूर पुसेसावळी या शटल सेवा सुरू केल्यास कराड तालुक्यातील सर्व गावातील विद्यार्थ्यांना कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी येणे सोयीस्कर होणार आहे. आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी या मागण्याचा सकारात्मकतेने विचार करून शटलसेवा सुरू करण्याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व काही करण्याची तयारी ः- रामकृष्ण वेताळ
विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. सुशिक्षित युवा वर्ग हाच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. यांच्या शिक्षणातील अडचणी कमी करून त्यांचे शिक्षण सुलभ करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येईल. यासाठी पक्षाच्या माध्यमातून व रामकृष्ण वेताळ युवा मंच यांच्या माध्यमातून सर्व सहकार्य केले जाईल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.