कराड पंचायत समितीच्या माजी उपसभापतीच्या मुलाच्या खूनाचा कट : चार जणांना अटक

कराड | विशाल वामनराव पाटील
हाॅटेलवर जेवणाच्या ऑर्डरवरुन झालेला वाद मनात धरून कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष सुहास बोराटे (रा. शिरवडे, ता. कराड) यांच्या खुनाचा कट आखणाऱ्या चाैघांना तळबीड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रितम चंद्रकांत पाटील (वय- 39, रा. वहागाव, ता.कराड), सागर अशोक पवार (वय- 31) व किरण मोहन पवार (वय- 31, रा. वहागांव ता.कराड), ऋषीकेश अशोक पाटील (वय- 22, रा. येणके ता.कराड) यांचे विरुध्द तळबीड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेलवडे हवेली (ता. कराड) गावचे हद्दीत असलेल्या हॉटेल आनंद हे प्रितम पाटील चालवित असतात. त्याचे हॉटेलवर (दि. 7 जुलै) शिरवडे (ता. कराड) येथील आयुष बोराटे हा जेवण करणे करीता आला होता. त्याचे व हॉटेल चालक प्रितम पाटील यांचेत जेवणाचे ऑर्डरवरुन वाद झाला. त्यावेळी आयुष याने त्याचा भाऊ वेदांत तसेच बाळू यादव याना बोलावून घेवून त्यावेळी आनंद हॉटेल येथे हॉटेलची मोडतोड व मोटार सायकलची मोडतोड केली होती. या भांडणांचा राग मनात धरुन हॉटेल चालक प्रितम पाटील याने त्याचा मित्र सागर पवार, कामगार किरण पवार व ऋषीकेश पाटील यांना सोबत घेवून सोमवारी आयुष बोराटे याला याचा खुन करण्याचा कट आखला होता. गुन्ह्यातील वाहनाचा नंबर कळू नये, म्हणून सागर पवार यांचे मोटार सायकलची नंबर प्लेटवर राख व माती फासून ती मुजवली होती. त्यानंतर ते चौघे त्या मोटार सायकल वरुन शिरवडे गावी जात असताना रात्रगस्तीवर असणाऱ्या महिला पोलीस हवालदार वाघमारे व चालक पो.कॉ पाटील यांना दिसले.
बेलवडे हवेली येथे (दि. 11) मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता दिसले. संशयितांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते निघून गेले. तेव्हा पोलीस ठाणे अंमलदार काका पाटील, तसेच पो. कॉ. फडतरे याना मदतीस बोलावून. संशयितांची मोटार सायकल ही तासवडे टोलनाक्याचे जवळ हायवेवर तासवडे एम.आय.डी.सी मध्ये जाणारे रोडवर पकडली. तेव्हा संशयितांना आयुष सुहास बोराटे याचा खून करणे करीता जात असल्याचे कबुली दिली. तेव्हा त्यांनी हायवेचे कडेला टाकलेली कुऱ्हाड, चाकू, कोयता दाखविला. गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व मोटार सायकल असे पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार उंबासे करत आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभाग्य पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली