कराडातील वादग्रस्त ‘प्ले हाऊस’ अखेर बंद होणार
कराड | कोयना कॉलनीतील तक्रारदार आंदोलकांच्या बेमुदत आंदोलनाच्या 17 व्या दिवशी कराड नगरपालिका ऍक्शन मोडवर आली आहे. प्रियांका प्ले हाऊस चालकांना 30 दिवसात प्ले हाऊस बंद करून स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोयना कॉलनीतील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या बेमुदत आंदोलनाच्या 17 व्या दिवशी भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरुच आहे.
प्रियांका प्ले हाऊस चालक ठक्कर यांना कराड नगरपालिकेने काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, कोयना सहकारी दूध पुरवठा सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कराड यांचा ठराव क्र. 7 (4) दि. 20 ऑक्टोबर 2022 च्या ठरावामध्ये नमुद असल्याप्रमाणे दि. 1 मे 2023 पासून सदर प्लॉटवर प्रियंकाले हाऊस यासाठी नवीन शैक्षणिक प्रवेश घेवू नये व नवीन शैक्षणिक वर्ष सदर ठिकाणी सुरु करणेत येऊ नये असा ठराव करणेत आलेला आहे. परंतु, आपण अद्यापही ठरावाचे पालन करून प्रियांका प्ले हाऊस बंद केल्याचे दिसून येत नाही. गृह निर्माण संस्थेची परवानगी नसताना आपण प्रियांका प्ले हाऊस सुरू ठेवल्याचे दिसून येते. तसेच आपण प्लॉट क्र. 600 ब/22 मधील मिळकती मध्ये प्ले हाऊस सुरू करण्याकरिता नगरपालिकेची परवानगी / ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. आपण मिळकतीचा वापर विनापरवाना करत आहात. तरी आपल्याला या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, आपण प्रियांका प्ले हाऊस 30 दिवसांच्या आत बंद करावे.
कोयना सहकारी दूध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी, गृह संस्था मर्यादित, कराड व कराड नगरपरिषद, कराड यांच्याकडून आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊनच प्रियांका प्ले हाऊस सुरु करावे. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,असा आदेश कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी काढला आहे.
पालिकेने हटवले प्ले हाऊसचे बोर्ड
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय कोयना कॉलनीमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करण्याचे आदेश कराड नगरपालिकेने पारित केले आहेत. आज दि. 28 रोजी प्रियांका प्लेअरचे सर्व फलक पालिका कर्मचाऱ्यानी हटवले.
बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार…
गेली 17 दिवसापासून आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज पालिकेने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रियांका प्ले हाऊस बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत ते बंद करण्याचे आदेश चालकांना दिले असल्याचे समजते.आम्हाला याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, असे असलेतरी सुद्धा जोपर्यंत प्ले हाऊस बंद होऊन स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आंदोलनकर्ते महिला /पुरुष यांनी सांगितले आहे.