घरातील गुप्तधनाचे अमिषाने 41 लाखांची फसवणूक : पाटण तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी | पाटण तालुक्यातील (जि. सातारा) येथील तिघांनी तुमच्या घरात गुप्तधन असून ते आम्ही काढून देतो, असे आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे नाका येथील एका कुटुंबाची तब्बला 41 लाख रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. प्रसाद हरिभाऊ जाधव (स्वामी) (वय- 47, रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) या तथाकथित भोंदूबाबासह विवेक यशवंत कदम (वय- 48, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा), ओंकार विकास कदम (वय- 23, करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, फिर्यादी विठाबाई अण्णाप्पा पवार (वय- 48, रा. भरणे नाका, गणेशनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदरचा प्रकार 1 मार्च 2022 ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत घडला आहे. यावेळी तथाकथित भोंदूसह तिघांनी पवार कुटुंबियांना तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते मी काढून देतो, असे खोटे सांगून फिर्यादीच्या घरात मंत्रतंत्र वाचून पूजापाठ, होमहवन करण्यात आले.
विठाबाई पवार यांचे नातेवाइकांकडून प्रसाद जाधव (स्वामी) यांनी पूजापाठ करण्यासाठी 40 लाख 65 हजार रुपये आणि फिर्यादीचा मुलगा रोहित यांच्या ग्रहशांतीसाठी 25 हजार रुपये, असे एकूण 40 लाख 90 हजार रुपये घेतले. संशयित आरोपीच्या सोबत पूजापाठ करण्यासाठी आलेल्या विवेक कदम व ओंकार विकास कदम (दोन्ही रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे.