सरकारमध्ये श्रेयवाद सुरू तर मुख्यमंत्र्यांना कृषीमंत्र्यावर विश्वास नाही : आ. रोहीत पवार
-विशाल वामनराव पाटील
महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक मध्ये जेव्हा कांद्यावरून शेतकरी आक्रमक झाले. तेव्हा राज्याचे कृषिमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर होते. या प्रश्नावर जपानमधून त्यांचे फोन सुरू झाले. कृषी मंत्र्यांनी दिल्लीला जाऊन ट्विट केले तर जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा केंद्रीय मंत्र्यांना फोन केला. मग मुख्यमंत्र्यांचा विश्वास कृषीमंत्र्यांवर नाही का. तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि केंद्राने नाफेड कडून कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले, असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी शिंदे- फडणवीस व पवार सरकारला लगावला. कराड येथे माध्यमांशी बोलत होते.
आ. रोहीत पवार म्हणाले, कांदा निर्यातीवर शुल्क आकारणी हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. या निर्णयात राजकारण होताना, सर्वजण पाहत आहेत. राज्य सरकारमध्ये क्रेडिट घेण्यासाठी सर्वच पुढारी धडपडत आहेत. तिघांचे सरकार एक आहे असे सर्वजण म्हणतात. परंतु तिन्ही पक्षांचे चेहरे वेगवेगळ्या दिशेला आहेत, हे जाणवत आहे. केंद्र सरकारने एक्सपोर्टवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान होणार असल्याची टीकाही रोहीत पवार यांनी सरकारवर केली.
शरद पवार यांनी एक्सपोर्टवर बंदी आणली नव्हती
खरंतर हा निर्णय घ्यायची गरज नव्हती. कारण आत्ताशी भाव वाढले होते. या सरकारमध्ये कुठेतरी ताळमेळ नाही. पत्रकार परिषद घेताना अजित दादा शेजारी बसले होते. या पत्रकार परिषदेत बोलत असताना, मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांना बरे वाटावे म्हणून त्यांची वाहवा करत आहेत. केंद्रातील नेत्यांची वाहवा केली. शरद पवार साहेबांनी कधीही असा निर्णय घेतला नाही, असे म्हटले. तेव्हा शेजारी बसलेल्या दादांना विचारायला पाहिजे होते. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे. अशी परिस्थिती शरद पवार साहेबांच्या काळात असताना त्यांनी एक्सपोर्टवर बंदी आणली नव्हती. याला म्हणतात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा नेता असे आ. रोहीत पवार म्हणाले.
नाफेड खरेदी करणार 2 टन आणि विकणार 3 टन कांदा
दोन लाख टन नाफेड कडून कांदा खरेदी करून काही उपयोग होणार नाही. केवळ बातम्या होतील, कार्यकर्त्यांना बोलायला संधी मिळेल. वातावरण निर्माण करतील. परंतु अगोदरच नाफेकडे तीन लाख टन कांदा आहे, तो विकणार असल्याचे म्हणत आहेत. तेव्हा दोन लाख टन खरेदी करणारे सरकार तीन लाख टन कांदा विकणार आहेत. अशावेळी मार्केटची परिस्थिती काय होणार यांचा अभ्यास त्यांनी केला आहे का सरकार शेतकऱ्यांच्या अडचण करत आहे. तेव्हा केंद्रातील नेत्यांचे वाहवा करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असा खोचक टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आ. रोहीत पवार यांनी लगावला.