कराड शहरातील स्फोटातील बळीची संख्या 2 : पत्नीनंतर पतीचाही मृत्यू
कराड | येथील मुजावर कॉलनीत ऑक्टोबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे शरीफ मुल्ला यांच्यासह तीन जण जखमी झाले होते. जखमी झालेल्या पैकी सुलताना शरीफ मुल्ला (वय 33) यांचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सुलताना यांचे पती शरीफ मुबारक मुल्ला (36) यांचाही मृत्यू झाला आहे. दोन दिवसाच्या अंतराने पती-पत्नीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , 25 ऑक्टोबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला आहे. या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या घरातील दोन लहान मुलासह त्यांच्या पत्नी सुलतान व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.
यादरम्यान बुधवारी शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचे उपचारादारम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून शरीफ मुल्ला यांना जास्त त्रास होऊ लागला अखेर दोन दिवसानंतर शरीफ मुल्ला यांचेही उपचारादरम्यान निधन झाले. शरीफ मुल्ला व सुलताना मुल्ला या पती-पत्नीच्या मृत्यूनंतर मुजावर कॉलनी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.