पोलिस पाटील ”बिनपगारी- फुल अधिकारी” : सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने दिवाळी कडू

– विशाल वामनराव पाटील
पोलिस आणि महसूल यंत्रणा असो की गावपातळीवरील कामे यासाठी पोलिस पाटील रात्रदिवसं झटताना पहायला मिळतात. गावातील काही घटना असो तेथे पोलिस पाटील हजर असतात, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या पोलिस पाटलांचे मानधन रखडल्याने ‘बिन पगारी फुल अधिकारी’ अशी अवस्था पोलिस पाटलांची शासनाने केली आहे. दिवाळी सणही मानधनाविना जाणार असल्याने पोलिस पाटलांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गावपातळीवर पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन यांना असो की शासनाची कोणताही योजना राबवयाची असो यासाठी ग्रामीण भागात पोलिस पाटील काम पाहतात. पोलिस पाटील यांची नेमणूक महसूल करते, त्यामुळे त्यांना पोलिसांसोबत महसूलचेही काम करावे लागते. मध्यतंरी ई-पीक पाहणीत पोलिस पाटलांना सक्तीने तलाठी आणि महसूल विभागाने राबवून घेतले. गावात गणपती, नवरात्र, सण- उत्सव असो की यात्रा- जत्रा तेथे पोलिस पाटील रात्रदिवसं कामाला उपस्थित असतात. या पोलिस पाटलांना शासनाकडून अवघे 6 हजार 500 रूपये मानधन मिळते. तरीही गेल्या 6 महिन्यापासून एक दमडी न मिळाल्याने पोलिस पाटलांच्यात अस्वस्था दिसून येत आहे.
शासनाकडून दिवाळी सण गोडधोड व्हावा, यासाठी लोकांना अनेक योजना दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शासनाचा एक भाग असलेल्या पोलिस पाटलांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यात नविन पोलिस पाटील नेमणूक करण्यात आली, त्यांना आजपर्यंत एकदाही मानधन मिळाले नाही. तर जुने पोलिस पाटील यांना 1 जूनपासूनचे मानधन रखडले आहे. अशातच दिवाळी सण असतानाही प्रशासन आणि शासनाला तंटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलिस पाटलांचे काही घेणे- देणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिस पाटलांची अवस्था ‘बिनपगारी- फुल अधिकारी’ अशी झाली आहे.