जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : कराड पालिकेची 3 कोटी 88 लाखांची वसुली करा

कराड । कराड नगर परिषदेने नियमानुसार जुन्या दराने पाणीपट्टी आकारण्याची कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी. तसेच चालू आर्थिक वर्षातील तसेच सन 2022- 23 व त्यापूर्वीची थकीत पाणीपट्टी वसुलीची कारवाई तात्काळ सुरू करण्याचा आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आला आहे. त्यामुळे आता पाणीपट्टी कराड पालिकेची 3 कोटी 88 लाखांची वसुली मोहिमेला गती येणार आहे.
याबाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कराड नगर परिषदेने पाणीपट्टी बिलामध्ये केलेली वाढ कमी करण्याबाबत कराड येथील नागरिकांच्या विनंती अर्जचा विचार करून दरवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र, जुन्या दराने पाणीपट्टी आकारणी करण्यास स्थगिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता नगर परिषदेकडून थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहिम राबवावी.
नागरिकांनी पाणीपट्टी भरावी, अफवांवर विश्वास ठेवू नये : उमेश महादर
कराड पालिकेची आतापर्यंत 3 कोटी 88 लाख वसुली थकित असून आता जुन्या दराने बिल काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे भरावेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, सहकार्य करावे, असे आवाहन घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कर निरीक्षक उमेश महादर यांनी केले आहे.