हर हर महादेव : शिंगणापूरच्या यात्रेत 13 भाविक दरीत कोसळले
शिंगणापूर | शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेव यात्रेनिमित्त मुंगी घाटातून कावड सोहळ्याचा थरार पहायला मिळाला. घाटातून कावड चढवितानाचा थरारा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी भर उन्हात मुंगी घाटावर अलोट गर्दी केली होती. या दरम्यान 13 भाविक दरीत कोसळल्याचे समोर आले असून या सर्वांना सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर काढले. या जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशी यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. अवघड अशा मुंगी घाटातून सासवड पंचक्रोशीतील मानाच्या कावडीने दुपारी दोन वाजल्यापासूनच मुंगी घाट चढण्यास सुरुवात केली. सर्व कावडी वाजत गाजत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. मुंगी घाटातून कावडी चढविण्याची परंपरा सुमारे 700 वर्षांपासून प्राचीन आहे. अवघड मुंगी घाट चढून वर माल्या मुंगी घाट कावडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुंगी घाट सोलापूर जिल्हा हद्दीत आहे, तर घाटाचा माथा सातारा जिल्हा हद्दीमध्ये आहे. द्वादशीच्या दिवशी सकाळपासून सर्व कावडी मुंगी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावात जमा झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा चढताना हजारो भाविक ‘भक्तिरसात न्हाऊन निघतात. ‘हर हर महादेव, ‘ ‘म्हाद्या धाव’ अशी शिवगर्जना करत भाविक अवजड अशा कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगी घाट सर केला.
शिंगणापूर यात्रेत कावड वर चढविताना पडून झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 13 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी फलटण येथे हलविण्यात आले, तसेच यात्रेत एक वृद्ध बेशुद्धावस्थेत आढळला, तर कावड वर चढवून आणल्यावर एक कावडीधारक अत्यवस्थ होऊन बेशुद्ध झाला. या दोघांनाही फलटण व दहिवडी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पोळ यांनी दिली.