कराड उत्तरेत निवडणुका आल्या काहीजण गाड्या, टेम्पोतून ढोल वाजवत फिरतात : आ. बाळासाहेब पाटील

विशाल वामनराव पाटील
विधानसभा निवडणुका आल्या, की अनेक विरोधक उठून बसतात. सन 2014 सालच्या निवडणुकीतही काही गाड्या, टेम्पोतून ढोल वाजवत फिरायचे 150 कोटीची कामे आणली. अशा प्रकारच्या वल्गना करायचे, गावातील जेष्ठ मंडळीना बोलवायचे अन् नारळ फोडायचे. अखेर मी प्रतिनिधी असल्याने गावातील लोक माझ्याकडे आली त्यांनी मला ती कामे करण्यास सांगितले, मी केली. आताही कराड उत्तरसाठी 26 कोटी 16 लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार श्री. पाटील यांनी त्याचे पुरावे दाखवले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी कोट्यवधींचा विकासनिधी आणल्याचा दावा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी त्यांनी केलेल्या मागणी व पुरावे दाखवत पत्रकार परिषदेत पोलखोल केली. यावेळी कराड युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी जिल्हा परिषद मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘उत्तरमध्ये निधी आल्याचे आकडे ऐकत असलो तरी निधी मंजूर होण्यासाठी प्रक्रिया असते. पुरवणी अर्थसंकल्पात आमदारांच्या शिफारशीने कामे मंजूर होतात. अजित पवार यांनी उत्तरमधील अशा 29 कामांसाठी 26 कोटी 16 लाखांचा निधी मंजूर केला आहे. उत्तरमध्ये निवडणुका आल्या, की काही लोक विकासकामांचे श्रेय घेतात. तेच सध्या चालू आहे. मात्र, त्यांच्याकडे त्याचे पुरावे नसणारच आहेत; कारण ती कामे माझ्याच शिफारशीने मंजूर आहेत.