पुणे- बेंगलोर महामार्गावर दिवसाढवळ्या वीजचोरी : अधिकारी ठेकेदारावर मेहेरबान का?

कराड । वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत महामार्ग ठेकेदाराकडून दिवसा ढवळ्या आकडे टाकून वीज चोरी सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असून लोकांना दिसणारी वीजचोरी अद्याप वीज अधिकाऱ्यांना दिसली नसल्याने लोकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी ठेकेदारावर एवढे का मेहेरबान झाले आहेत, असा सवाल सामान्य लोक व शेतकऱ्यांच्यातून उपस्थित केला जावू लागला आहे.
सध्या पुणे- बेगंलोर महामार्गाचे सहापदरीचे काम जोरदारपणे सुरू आहे. सहापदरी रुंदीकरणामध्ये महामार्गाची तिसरी लेन व सेवा रस्ते यादरम्यान सिमेंटचे नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. सिमेंट बांधकाम असल्याने त्यामध्ये स्टीलचा वापर करण्यात येत आहे. वहागाव परिसरातही महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या तिस-या लेनचे काम सुरू आहे. महामार्गाच्या बांधकाम ठेकेदाराकडून या कामासोबतच तिसरी लेन व सेवारस्ता यामधील नाले बांधकाम करण्यात येत आहे. नाल्याच्या सिमेंट बांधकामासाठी स्टीलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे स्टील कटिंग करावे लागत आहे. दरम्यान, वहागाव परिसरात युवराज देशमुख यांच्या जमिनीच्या प्लॉट जवळच गेल्या वर्षी वीज वितरण कडून नवीन डीपी उभारण्यात आला आहे. महामार्ग ठेकेदाराने या डीपी मधून जाणाऱ्या वायरवर आकडे टाकून वीज चोरी सुरू आहे. गेल्या एक महिन्यापासून राजरोसपणे दिवस-रात्र वीज चोरी सुरू असून ठेकेदारांकडून चोरण्यात येणाऱ्या वीज कनेक्शनला मशनरी लावून स्टीलचे कटिंग करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर वीज चोरी सुरू असूनही वीज वितरण कंपनीला याबाबत कुठलीच खबर नाही, याचे मोठे आश्चर्य आहे. सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे एका महिन्याचे वीज बिल थकले तर तत्परतेने त्या सर्वसामान्यावर तात्काळ कारवाई करत वीज कनेक्शन कापले जाते. मात्र एक महिन्यापासून राजरोसपणे बेधडक वीज चोरी सुरू आहे. तरीही वीज वितरण कंपनी डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. त्यामुळे वीज चोरीत वीज वितरण कंपनीचा सहभाग तर नाही ना या प्रकारची चर्चा परिसरात सुरू आहे.
वीजचोरीची वसुली करावी अन्यथा आंदोलन : प्रणव ताटे
वीज वितरण कंपनीकडून नेहमी वेगवेगळे कर लावून सर्वसामान्यांकडून वीज वसुली केली जाते. तसेच जर वीज बिल थकले तर त्या सर्वसामान्याचे वीज कनेक्शन तात्काळ कापले जाते. दरम्यान, महामार्ग ठेकेदाराकडून एक महिन्यापासून वीज चोरी सुरू आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने महामार्ग ठेकेदारावर कडक कारवाई करून वीज चोरीची वसूली करावी अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे यांनी दिला आहे.