खंबाटकी घाटात इंजिनिअर तरूण- तरूणी ट्रकच्या चाकाखाली चिरडले

सातारा | पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाजवळ धोम बलकवडी कालव्यानजीक रविवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकी खड्ड्यात आदळून युवक, युवती जागीच ठार झाली. या अपघातात खड्ड्यात दुचाकी आदळल्याने रस्त्यावर पडल्याने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून युवक, युवतीचा मृत्यू झाला. दीक्षा सुनील पाटील आणि रोहित दिनेश पाटील (सध्या रा. पुणे, मूळ जळगाव जिल्हा) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही पुणे येथे इंजिनिअरिंग कंपनीत काम करत होते.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित आणि दीक्षा हे दोघे रविवारी रात्री सातारा बाजूकडून पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. रात्री नऊच्या सुमारास त्यांची दुचाकी खंबाटकी घाट क्रॉस करून धोम बलकवडी कालव्यानजीक आली. रात्री खड्डा न दिसल्याने त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात आदळल्याने ते खाली पडले. याच वेळी जवळून ट्रक जात होता. या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दीक्षा आणि रोहित हे चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रस्त्याच्या बाजूला केले. हे मृतदेह खंडाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
खंबाटकी घाटात दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणपती उत्सवासाठी मुंबई- पुण्याहून गावी येणाऱ्या चाकरमानी दिसत होते. वाहनांच्या रांगामुळे कडक उन्हामुळे अनेक गाड्या बंद पडल्याने ट्राॅफिक मोठ्या प्रमाणावर जाम झालेले होते. पोलिस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. जवळपास 3 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर या वाहतूककोडींने वाहन चालक व प्रवाशी हैराण झालेले होते.