भाजपसोबत अजित पवार आले तरी मुख्यमंत्रीपद नाही : केंद्रीय मंत्र्याचा दावा
सातारा | अजित पवार भाजपबरोबर आले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटत नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील. टांगती तलवार एकनाथ शिंदे यांच्यावर नाहीतर उध्दव ठाकरे यांच्यावर असल्याचा दावाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.
मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचा निकाल झाला आता सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल मेरीटवर लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 75 टक्के आमदार आणि खासदार आहेत. उध्दव ठाकरे यांनी आमदारांची कामेच केली नाहीत. कोरोना काळात त्यांना भेटलेही नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेवर नाहीतर उध्दव ठाकरेंवर टांगती तलावर आहे.
शिर्डीला अधिवेशनाला 50 हजार कार्यकर्ते येणार
”रिपाइं’चे अधिवेशन 28 मे रोजी शिर्डी येथे होणार आहे. देशातून 50 हजार कार्यकर्ते येतील असे नियोजन आहे. यामध्ये नागालॅंडमधील आमच्या पक्षाचे दोन आमदारही सहभागी होतील. देशात पक्षवाढीवर भर देण्यात येणार आहे. अधिवेशनात भूमिहीन कुटुंबांना पाच एकर जमीन द्यावी, अशी आमची मागणी राहणार आहे. तेव्हाच, शहराकडे येणारे लोंढे थांबतील. गावातील माणूस गावातच राहील, असे मंत्री रामदास आठवले म्हणाले.