साताऱ्यात शेतकऱ्यांनी आणले 100 हून अधिक ट्रॅक्टर : मनोज जरांगेंना पाठिंबा
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साताऱ्यातील मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठे व्यापक स्वरूप पाहायला मिळत आहे. दरम्यान, दररोज जिल्हाभरातून गावा- गावांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे. त्याच निमित्ताने साताऱ्यातील मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्ह्यातील मराठा शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढत आज अनोखा पाठिंबा दिला. दरम्यान, शेतीची सर्व कामे थांबवून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत मराठा समाजाला पाठिंबा दर्शविला आहे. या रॅलीत 150 हून अधिक ट्रॅक्टर आणि मालकांनी सहभाग नोंदवला.
या रॅलीची सुरूवात बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून झाली तेथून रॅली बसस्थानक परिसरत, राधिका रोड तेथून राजवाडा बसस्थानक ते नगरपालिका समोरून पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून रॅली काढण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याने साताऱ्यातील सर्व रस्त्यावर टॅक्टरच टॅक्टर दिसत होते. ट्रॅक्टर चालकांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजीही केली. दरम्यान या रॅली मधे 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते.
सातारा शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत असून पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. शहरातील अनेक नागरिक मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असून उपोषस्थळी उपस्थित राहत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेसोबत सातारा जिल्ह्यातील मराठा समाज असेल असेही सांगण्यात आले. दोन दिवसापूर्वी मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली होती. तर कराड येथे काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो बांधव सहभागी झाले होते. त्यासोबत प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील गावा- गावात मराठा आरक्षणासाठी मोठी जनजागृती होवू लागली आहे.