कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

सुपने- तांबवे भागातील शेतकरी आक्रमक : मागण्या मान्य न झाल्यास असहकार आंदोलनाचा इशारा

शेकडो शेतकऱ्यांचा विजयनगर येथील महावितरण कार्यालयावर धडक

कराड | सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असून सर्वच बागायती पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासुन सुपने- तांबवे विभागात शेतीपंपाच्या विजेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके वाळू लागलेली आहेत. विहीरी, नद्या भरलेल्या असताना केवळ वीज वितरण कंपनीकडून वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तेव्हा येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा तांबवे- सुपने विभागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

विजयनगर- मुंढे (ता. कराड) येथील महावितरणच्या अधिकारी स्वप्निल जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतासाठी जेमतेम 8 तास वीज देण्यात येत असून ती वारंवारं खंडित होत आहे. अघोषित भारनियमन केले जात असल्याने शेतकऱ्यांना 4 तास सुद्धा वीज मिळत नाही. परिणामी ऐन उन्हाळ्यात सर्व पिके जळून जाऊ लागली आहेत. त्यामुळे आज शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते, अनेकदा सेवा दिल्या जात नसल्याचा आरोपही केला.

Farmers in Supane-Tambwe

यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे ः-
1) वास्तवीक शेती पंपाला दिवसा 8 तास व रात्री 10 तास असा वीज पुरवठा करण्यात येत होता. मात्र, सध्या कुठल्याही शेतकऱ्याचा विचार न करता रात्रीचे 2 तास वीज पुरवठा कमी करण्यात झाला आहे. तरी पुर्वी प्रमाणे दिवसा 8 तास व रात्री 10 तास सलग अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.
2) मार्च, एप्रिल, मे व जुनच्या मध्या पर्यंत तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असतो. या काळात पिकांना पाण्याची तीव्र आवश्यकता असते. नेमके याच कालावधीत विजेचा खेळखंडोबा होता. तरी या कालावधीत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.
3) प्रत्येक सरकारकडून गेल्या अनेक वर्षापासुन शेतक-यांना दिवसा 12 तास वीज देण्याची घोषणा निवडणुक प्रचारापुरती करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नाही. शेतकरी वर्षानुवर्षे रात्री- अपरात्री बिबट्या, साप, विंचु अशा प्राण्यांच्या दहशतीत मृत्युच्या टांगत्या तलवारीखाली नाइलाजाने शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. शेजारी
अनेक राज्यात 24 तास विज पुरवठा होत असताना महाराष्ट्रात का नाही? तेव्हा शेतीला योग्यप्रकारे वीज देण्याचा निर्णय ताबडतोब घ्यावा.
4) काही राज्यांत शेतक-यांना मोफत वीज दिली जाते. अशावेळी महाराष्ट्रात विकत महागडा वीज पुरवठा होत असताना आणखी वीज बिलात करवाढ केली आहे. तेव्हा ती अन्यायी वीज दरवाढ ताबडतोब मागे घेण्यात यावी.
5) शेतीला विज पुरवठा करणारे महाविरणचे डिपी, पोल, ट्रान्सफॉर्मर, तारा यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. फ्यूज बॉक्स, वाकलेले पोल यामुळे शेतक-यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना जीवाला मुकावे लागले आहे. तेव्हा सर्व यंत्रणा दुरुस्त करण्यात यावी किंवा नवीन बसवण्यात यावी.

अन्यथा असहकार आंदोलन : विश्वासराव कणसे
आम्ही वीज वितरणला आज आमचे निवेदन दिले आहे. येत्या 8 दिवसात आमच्या मागण्यांचा विचार करून काही प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. परंतु, महत्वाच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही असहकार आंदोलन पुकारणार असल्याचे साकुर्डी गावचे उपसरपंच व शेतकरी विश्वासराव कणसे यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker