शेतकऱ्यांनो घोषणाबाजी करणाऱ्यांना पाटण बाजार समितीतून दूर ठेवा : विक्रमसिंह पाटणकर
पाटण | तालुक्यात विकासाच्या नावाखाली पाचशे कोटी, दोनशे, शंभर कोटी अशा केवळ घोषणा देवून जनतेला भूलवत ठेवले जात आहे. शेकडो कोटींच्या केवळ बाताच सुरू असून शेतकऱ्यांनी आता उठाव करण्याची वेळ आली आहे. बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून घोषणाबाजी करणाऱ्यांना दूर ठेवा, असे आवाहन माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिक्का मॅन्शन (वाडा) पाटण येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, राष्ट्रीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, ठाकरे गटाचे जिल्हा संघटक व सरपंच गजानन कदम, जिल्हा उपप्रमुख रविंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, संस्थेचे दोन पेट्रोल पंप, एक मोठे गोडाऊन आहे. संस्थेमार्फत कामे करत असताना विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत नेहमी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न हाणून पाडून सर्वांच्या सहकार्याने आज संस्था चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. संस्थेचा, शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी ही संस्था पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवायची आहे. त्यादृष्टीने सर्वांनी महायुती म्हणून एकजुटीने काम करूयात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजाभाऊ शेलार, गजानन कदम, डॉ. संतोष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार यांनी प्रास्ताविक केले. हेळवाकचे सरपंच गजानन कदम यांनी आभार मानले.