साताऱ्यात पैलवानावर कोयत्याने जीवघेणा हल्ला : संशयित 7 जण फरार

सातारा | दत्ता जाधवचा मुलगा लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पैलवान विक्रम वाघमारे हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान प्रतापसिंह नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता जाधव यांच्या मुलगा जो नुकताच मोक्यातून सुटून बाहेर आला आहे. त्याने आणि त्याच्या सहा साथीदारांनी भंगार व्यावसायिक पैलवान विक्रम वाघमारे याच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. मात्र, सुदैवाने यात विक्रम पैलवान बचावला असून गंभीर जखमी असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच लल्लन जाधव हा संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का मधून सुटून बाहेर आला आहे.
सातारा शहर पोलिसांनी लल्लन जाधवसह आणखी 6 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर लल्लन व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संपूर्ण प्रतापसिंह नगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागील भांडणातून अथवा वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.