कोपर्डेत मुलाकडून बापाचा खून, नातेवाईकांनी केला गुपचुप अंत्यसंस्कार पण…
कराड | कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे मुलाने बापास लाकडी दांडक्याने मारले. यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत संजय शामराव सरगडे (वय 53, रा. कोपर्डे हवेली. ता. कराड) यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून कराड तालुका पोलिसांनी मुलास अटक केली आहे. तानाजी लक्ष्मण होवाळ (वय 65, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अभिजीत उर्फ पप्या होवाळ असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा घराचे बाहेरील बाजूस उभा राहून कोणाला तरी फोन लावून फोनवर मी पप्पाला मारला आहे आणि मी आता मुंबईला जाणार आहे असे सांगत असताना फिर्यादीने ते ऐकले होते. त्यानंतर रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा लहान भाऊ राजेंद्र सरगडे याचेकडून समजले की, पप्याच्या बापाला पप्याने लाकडाने मारले आहे व तो पळून निघून गेला आहे. रात्री पावणे दोन वाजता फिर्यादीने होवाळ यांच्या घरी जाऊन पाहिले असतता तेथे तानाजी होवाळ मयत झाले होते. त्यांचे अंगावर चादर टाकलेली होती. त्या चादरीवरती रक्ताचे डाग पडलेले दिसत होते. त्याशेजारीच लाकडे पडलेली दिसत होती. मयता शेजारी पत्नी, मुलगी बसलेल्या दिसून आल्या. मात्र पप्या तेथे नसलेमुळे ग्रामस्थांमध्ये पप्याने घातपात केलेबाबत चर्चा सुरू होती.
त्यानंतर तेथे जमलेल्या नातेवाईकांनी मयत तानाजी होवाळ यांच्यावर पहाटे कोपर्डे हवेली येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार केले. या सर्व घटनेची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी पप्या यास ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत.