पहिल्यांदाच मुस्लिम महिलेला संधी : कोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लतिफा फकीर बिनविरोध
कोळे | सर्व धर्म समभावनेचे प्रतीक असलेले ऐतिहासिक कोळे गावच्या सरपंचपदी लतीफा अमानुल्ला फकीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 1933 साली स्थापन झालेल्या कोळे ग्रामपंचायतींच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला “सरपंच”पद मिळाले असल्याने समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, युवानेते उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची सत्ता कोळे ग्रामपंचायतीमध्ये आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निकटवर्ती, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कै. मन्सूर फकीर यांच्या लतिफा फकीर या वहिनी तर दैनिक “लक्ष्मीपुत्र”चे संपादक सुलतान फकीर यांच्या यांच्या मातोश्री आहेत.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे एकच अर्ज दाखल झाल्याने कोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लतीफा फकीर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी कोळे ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी पोतदार यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केला. लतिफा फकीर यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांना बरोबर घेऊन गावाची परंपरा व विकासासाठी मी काम करीत राहीन अशी ग्वाही सरपंच लतिफा फकीर यांनी यावेळी दिली.