वनविभागाचे रेस्क्यु ऑपरेशन : चरेगावात बिबट्याचा बछडा अन् मादीची भेट
उंब्रज | चरेगाव येथे बेघर वसाहत परिसरात दोन दिवसापूर्वी सकाळी बिबट्याचा एक सात ते आठ महिन्यांचा बछडा रस्त्याकडेला लाकडाच्या ओंडक्यात अडकल्याचे आढळून आला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाने त्यास ताब्यात घेतले व मादी बिबट्याशी त्याची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वनविभागाच्या रेस्क्यु ऑपरेशनला यश आले असून पहाटे 4.15 च्या सुमारास मादी बिबट्याने बछड्याला अधिवासात नेले. वनविभागाने लावलेल्या ट्रप्प कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चरेगाव येथे शशिकांत बबन कुंभार यांच्या घराच्या आवारात शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले त्यांनी त्वरित ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभाग व सर्पमित्रांच्या टीमने बछड्याला पकडण्यात यश आले. गावातील बेलदरे रोडला असणाऱ्या बेघरवस्ती जवळ छप्परा शेजारी टाकलेल्या लाकडाच्या ओंडक्यात बिबट्याचा बछडा आढळून आला. घटनास्थळी वनविभागाने बिबट्याचा बछडा व मादी यांच्या पुनर्मिलनासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन दिवस वनविभागाने यासाठी प्रयत्न केले.
शुक्रवारी रात्री व शनिवारी मादी बिबट्या या परिसरात रेंगाळत होती. अखेर रविवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मादीने बछड्याला तिच्या अधिवासात नेले आहे. घटनास्थळी वनरक्षक, वनपाल, वनसेवक, तसेच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन चे सदस्य सर्पमित्र निलेश कांबळे यांनी मादी व बछड्याच्या पुनर्मिलनासाठी प्रयत्न केले