माजी पंचायत समितीच्या सदस्याच्या भावावर जमिनीच्या वादातून हल्ला
कराड | गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत बांबूचा माळ नावाच्या शिवारात saffron हाँटेलजवळ जमिनीच्या वादातून दोन गटात चाकू व कोयत्याने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्याचा भावासह दोन्हीकडील तिघेजण जखमी झाले आहेत. मतीन मुतवल्ली, मुकुंद पाटील, नयन पाटील अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर हायवेनजीक गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीतील बांबूचा माळ नावाच्या शिवारात मुतवल्ली कुंटुब शेतात काम करत असताना त्याठिकाणी कराड पंचायत समितीचे माजी सदस्याचा भाऊ मुकुंद पाटील, नयन पाटील व अन्य एकजण या जमिनीचा वाद सुरू आहे. तुम्ही या जमिनीत काम करू नका असे म्हणाला असता, त्यातून दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये चाकू व कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये मतीन मुतवल्ली याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर मुकुंद पाटील याच्या पोटाला गंभीर इजा झाली. तर नयन पाटील हा सुद्धा गंभीर जखमी झाला. जखमींवर कराड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी भेट दिली. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उंब्रज पोलीसांमुळे पुढील अनर्थ टळला
दोन कुटुंबांतील हाणामारीची घटना सुरू असतानाच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पीएसआय महेश पाटील हे कराडहून उंब्रजच्या दिशेला निघाले होते. यावेळी तात्काळ त्यांनी गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांसह भांडणाच्या दिशेला धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हाणामारीतील जखमीचे रक्त प्रशांत बधे यांच्या कपड्यावर पडले होते.