कोर्टाचा आज निर्णय : पृथ्वीराज चव्हाणांनी 9 महिन्यापूर्वीच सांगितलेली ‘ती चूक’ महागात…

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं बहुप्रतिक्षित निकाल दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही पूर्वस्थिती लागू करुन सरकार पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले असते, असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती लागू करण्याचे निर्देश दिले असते, असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलं. कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण ९ महिन्यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले होते.
उध्दव ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. घाईघाईत राजीनामा देऊन त्यांनी मोठी चूक केली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच म्हटलं होतं. ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करुन राजीनाम्याची घोषणा केली होती. आजच्या कोर्टाच्या निकालानंतर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीची देशात व राज्यात चर्चा होवू लागली आहे.
‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीत राजीनामा देऊन मोठी चूक केली. त्यांनी विधिमंडळात जाऊन भाषण करायला हवं होतं. आपली बाजू मांडायला हवी होती. ठाकरेंनी त्यांच्यापुढची परिस्थिती सदनात मांडली असती, तर त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात झाली असती. बहुमत सिध्द करण्यात अपयश आले असते तरी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लघंन जनतेसमोर झालं असतं. या सर्व बाबीचं आणि त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं,’ असं चव्हाण यांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल देताना नेमका हाच मुद्दा मांडला. त्यामुळे चव्हाणांचा शब्दनशब्द खरा ठरला.