अखेर ठरलं…Satara Loksabha पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉ. अतुल भोसलेंची उमेदवारी घोषित, राजेंच काय?

विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणारे यावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या . मात्र, आता यावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले असून महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर महायुतीकडून भाजपच्या कमळ चिन्हावरती डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी दिल्लीतून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता साताऱ्याचा पुढील खासदार कराड विभागातीलच असणार हे स्पष्ट झाले आहे. तर छत्रपती उदयनराजे भोसले काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागून आहे. आज 1 एप्रिल रोजी उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादी फुटीनंतर आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माघारीनंतर साताऱ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत बरेच दिवस झाले चर्चा रंगल्या होत्या. महायुतीतून भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तर अजित पवार गटाकडून या जागेसाठी मोठा आग्रह केला गेला. मात्र, अखेर भाजपाकडून कमळ चिन्हावर अधिकृतरित्या डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कामराबंद चर्चा केली होती. सातारा लोकसभेसाठी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत असताना. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागल्याचे समजते. यामुळे आता सातारा लोकसभेचा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रश्न मिटला आहे. महायुतीतून छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट नाकारल्याने ते आता अपक्ष निवडणूक लढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अजित पवार यांच्या गटातील नितीन पाटील आणि आमदार मकरंद पाटील यांची भूमिका काय राहणार तसेच वाई, जावली, महाबळेश्वर आणि खंडाळा या भागातील मतदार कोणाला साथ देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
कराड विभागातील डॉ. अतुल भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे. विधानसभेला असणारी राजकीय परिस्थिती लोकसभेलाही दिसून येणार आहे. लोकसभेच्या या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या रयत संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. कारण पुढील विधानसभेसाठी ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे काँग्रेसकडून उमेदवार असणार हे निश्चित आहे. मात्र, भाजपाकडून कोण लढणार असा आता सवाल उपस्थित होत असून नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आता भाजपवर येणार आहे. या बातमीचा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा काही संबंध नसून आपणास ‘एप्रिल फुल’ करण्यात आले आहे. दि. 1 एप्रिल 2024 Happy April Fool’S Day