साताऱ्यात बंदचा परिणाम : कराडला 5 जिल्ह्यातील बसेस 2 तास थांबल्या, पाटणला पूर्णच ठप्प

कराड | मराठा सकल समाजाकडून पुकारण्यात आलेल्या सातारा जिल्हा बंद मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 8 ते 11.30 च्या दरम्यान पुणे, मुंबई, सातारा, सांगली व कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसेस कराड एसटी आगारात सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्या होत्या. कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी परस्थितीचा आढावा घेवून 11.30 नंतर एसटी बसेस मार्गस्थ करण्याच्या सूचना केल्या. एसटी बसेसच्या सुरक्षिततेसाठी 2 तासानंतर लांबपल्याच्या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून एसटीला लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याची माहिती कराड बस आगाराच्या प्रमुख शर्मिला पोळ यांनी सांगितले. तर पाटण आगारातील एसटी बसेस वाहतूक पूर्णच ठप्प झाली होती, तर खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी 100 टक्के प्रतिसाद दिला. पाटण तालुक्यात बंद पाळत रास्तारोको करण्यात आला. नवारस्ता, मल्हापरपेठ, ढेबेवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कराड येथे मुख्य बाजारपेठेसह महाविद्यालयेही बंद होती. सकाळी 8 वाजल्यापासून लांबपल्याच्या एसटी बसेस कराड, सातारा बस आगारात थांबविण्यात आल्या. सकाळी 10 वाजता पोलिस बंदोबस्त बस आगारात तैनात करण्यात आला होता. यावेळी महामार्गावर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून 11.30 नंतर बसेस मार्गस्थ करण्यात आल्या.
सातारा येथील शिवतीर्थ येथे मराठा मोर्चाकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महामार्ग काही काळ थांबविण्यात आला. फलटण येथे क्रातिसिंह नाना पाटील चाैकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दहिवडी येथे मूक मोर्चा काढत जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. खटाव, माण, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, खंडाळा, फलटण, कोरेगाव व कराड- पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.