नगरसेविकेच्या कुटुंबावर टोळक्याचा तलवार हल्ला : 5 जखमी, 15 जणांवर गुन्हा

महाबळेश्वर | मेटतळे (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली आहे. महाड येथून कार्यक्रमास संपल्यानंतर मेटतळे येथे परतणाऱ्या कुटुंबावर दबा धरून बसलेल्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी नगरसेविका श्रद्धा रोकडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी पोलिस बंदोबस्त वाढविला.
या हल्ला प्रकरणात पोलिसांनी सुमारे 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महाबळेश्वरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेबाबत उमेश रोकडे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.