तळबीड येथे रेशनिंग दुकानातील धान्य विक्रीस नेताना सरपंच, ग्रामस्थांनी पकडले

कराड | तळबीड (ता. कराड) येथे स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदळाची पोती खुल्या बाजारात विक्रीस नेत असताना सरपंच आणि ग्रामस्थांनी महिंद्रा पिकअप पकडली आहे. पुरवठा विभागाकडून पिकअप मधील गहू आणि तांदळाची एकूण 38 पोती जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई शनिवारी दुपारी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी, आज दुपारी तळबीड येथील स्वस्त धान्य दुकानदार मुलाणी यांच्याकडून दाऊद हुसेन मोकाशी (वय- 28, रा. मार्केट यार्ड- कराड) हा महिंद्रा पिकअप क्रमांक (एमएच- 50- 8278) मधून धान्याची काही पोती खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना ग्रामस्थांनी कराड तहसीलदार विजय पवार यांना फोन करून सदरची माहिती दिली. महिंद्रा पिकअपमध्ये गहू आणि तांदूळाची पोती भरल्यानंतर गाडी तळबीड गावातून बाहेर घेवून जातानासरपंच मृणालिनी मोहिते, उमेश मोहिते, राजेंद्र मोहिते, विशाल मोहिते व अमोल लोहार यांनी सदरची गाडी ग्रामपंचायती जवळ आल्यावर थांबवली. त्यावेळी महिंद्रा पिकअप टेम्पोंची तपासणी केली असता 50 किलो वजनाची तांदूळाची 30 व गव्हाची 8 पोती मिळून आली.
ग्रामस्थांनी चालक दाऊद मोकाशी याच्याकडे चौकशी केली असता त्यांने सदरचे धान्य खराब असून त्यासाठी परत गोडाऊनमध्ये नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर कराड पुरवठा विभागाचे निरीक्षक एम. एस. आष्टेकर यांनी तळबीड येथे घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. त्यावेळी चालक दाऊद मोकाशी याने हा धान्यसाठा कराड येथील बंडा पाटणे यांच्या गोडाऊनला घेऊन जाणार होता, असे सांगितले आहे. या कारवाईत पुरवठा निरीक्षक एम. एस. आष्टेकर तळबीड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश पिसाळ, हवालदार शहाजी पाटील, महेश शिंदे यांनी सहभाग घेतला.